सार्वजनिक जागांचे शहरी समाज जीवनातील महत्त्व -

शहरे म्हटल्यावर अनेकांच्या डोळ्यासमोर जे चित्र उभे राहते ते नेमके कोणते चित्र असते, तर मोठ-मोठ्या उंच इमारती, मोठे रस्ते, पूल, वस्त्या, शॉपिंग मॉल्स, हॉटेल्स, चकाकणाऱ्या बाजारपेठा आणि ट्राफिक इ;. शहरात या सगळ्याच्या पलीकडे एक गोष्ट असते, जी शहराला शहर म्हणून विकसित करते. त्याला मानवी अस्तित्वाच जीवंत रूप देते आणि ती गोष्ट म्हणजे, शहरातील सार्वजनिक जागा होय. शहरे विकासाची संधी देतात शिक्षणाची, नोकरीची संधी देतात, त्याइतकच सार्वजनिक जागांचे सुद्धा महत्त्व आहे. शहर विकासात सार्वजनिक जागांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. सार्वजनिक ठिकाणे आपल्या शहरांची महत्त्वपूर्ण मालमत्ता आहेत. लोकांना एकत्र येण्याची आणि समुदायामध्ये एकमेकांसोबत जोडले जाण्याच्या बर्‍याच संधी या जागा प्रदान करतात.


आपल्या शहरात सार्वजनिक जागा नेमक्या कोणत्या असतात - उद्याने, बस स्टॉप, शॉपिंग सेंटर, गल्लीच्या तोंडावर नागरिक एकत्र बेंच वर बसतात तो बेंच, गणपती मंडळ किंवा इतर ठिकाणी केलेले छोटे शेड व बेंच किंवा अशी कोणतीही मोकळी जागा जिथे लोक एकत्र येऊ शकतील. अनेकदा पायऱ्या, कोपरे हे सुद्धा लोकांसाठी एकत्र येणाच्या जागा बनतात. वाहनांच्या सोयीऐवजी लोकांना एकत्रित चालता येईल, व्यवस्थित वावरता येतील इतके पुरेसे रुंद फुटपाथ हे सुद्धा सार्वजनिक जागांमध्ये येतात.

सार्वजनिक जागा समाजातील लोकांना एकमेकांशी जोडतात-
सार्वजनिक जागेवर विविध प्रकारचे लोक सोबत येऊन चर्चा, संवाद करतात. एकमेकांमध्ये मिसळतात. त्याने माणूस म्हणून समाजाशी इतर व्यक्तींशी जोडली जाण्याची गरज भागते. घराच्या बाहेर पडून इतर लोकांशी संबंध आल्याने माणसाला विविध प्रकारच्या प्रेरणा मिळतात, काम करण्यास प्रोत्साहन मिळते. याने शहरी समाज जीवन चांगले व सुदृढ राहण्यास मदत होते. शहरात अनेक अशी ठिकाणे आपण बघतो ज्या ठिकाणी लोक एकत्र येतात - ते म्हणजे एखाद्या गल्लीच्या सुरूवातीला बेंच वर बसलेले ज्येष्ठ नागरिक, फुटपाथच्या बाजूच्या दुकानाच्या पायर्‍यांवर बसलेले कॉलेजवयीन मुले-मुली असो की पार्क मध्ये खेळणारी मुले असो की विविध रंगांनी भरलेला बाजार या सगळ्या गोष्टींमुळे विविध प्रकारचे लोक एकमेकांच्या सहवासात येतात. यामुळे शहराला जिवंतपणा प्राप्त होतो.

IMG 3541

 

मागच्या दीड वर्षापासून शाश्वत शहरी वाहतूक व्यवस्थेतील कार्यकर्ती आणि निमशहरी भागातून व मध्यमवर्गीय घरातून आलेली मुलगी म्हणून, ६ वर्षांपासून पुण्यासारख्या महानगरात राहत असताना मी विचार केला की शहराने मला शिक्षण आणि नोकरीच्या व्यतिरिक्त महत्वाच असं काय दिलं तर ते म्हणजे सार्वजनिक जागी थांबून शहर अनुभवण्याचे, शहरात विविध ठिकाणी फिरण्याचे स्वातंत्र्य. यामुळे विविध लोकांच्या सहवासात जाण्याची संधी मिळाली. यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि तुम्ही वेगवेगळ्या स्तरातील व्यक्तींशी जोडले जाता. सार्वजनिक ठिकानी इतर व्यक्तींशी जोडले जाताना समाजातील आजूबाजूच्या वास्तवाची जाणीव ही होत असते. सार्वजनिक ठिकाणी मुलगी म्हणून गाव खेड्यात व शहरात ही मुलींच्या व स्त्रियांच्या बाहेर फिरण्यावर/ मोबिलिटीवर बंधने असतात. पण जर शहराच्या सार्वजनिक जागा शहर नियोजनाचा सर्वसमावेशक असा भाग असतील तर स्त्रिया आणि इतर वंचित घटक सार्वजनिक जागांचा लाभ घेऊ शकतात. त्यानुसार सर्व घटकातील लोक सार्वजनिक जागा वापरू शकतील असे शहर नियोजन असायला हवे. सध्याच्या सार्वजनिक जागा तुम्हाला मोकळेपणाने फिरण्याचे स्वातंत्र्य देतात पण काही स्तरातील लोकांसाठी ते मर्यादित स्वरूपाचे आहे. सर्वच सार्वजनिक जागा सर्वांसाठी खुल्या असतात किंवा सर्वच लोक, सर्व सार्वजनिक जागांपर्यंत पोचू शकत नiहीत. समाजात जी विषमता आहे, ती या ठिकाणी ही दिसते. विविध स्तरातील लोक एकत्र येऊ शकतील अश्या सर्वांना सामावून घेणार्‍या सार्वजनिक जागा शहर विकासातून तयार करणे गरजेचे आहे.

शहरातील झोपडपट्टी मध्ये पुरेशी जागा आणि सूर्यप्रकाशाशिवाय मर्यादीत खोलीत अनेक लोक वास्तव्य करत असतात, त्यांना आरोग्याचा त्रास होण्याची शक्यता वाढते. पुरेसा सूर्यप्रकाश त्यांना सार्वजनिक ठिकाणी मिळतो, असे संशोधनातून दिसून आलेले आहे. तसेच व्यक्तीगत स्पेस नसते तेव्हा अनेक गोष्टींसाठी सार्वजनिक जागांचा उपयोग होतो. या वंचित समूहातील अनेक लोक सार्वजनिक जागांवर राहत असतात. अनेक मुलभूत गरजा जसे की अन्न, वस्त्र, निवारा भागत नसताना सार्वजनिक जागाच त्यांच्या आयुष्याला आधार देत असतात. अनेक स्थलांतर करणारे समूह देखील सार्वजनिक जागांचा वापर करत असतात. झोपडपट्टीत राहणार्‍या किंवा इतर वंचित समूहातील लोकांसाठी सार्वजनिक जागा फक्त कपडे वाळत घालणे किंवा इतर वापरासाठी मर्यादित नाहीत तर ती त्यांच्या जगण्याच्या अभिव्यक्तीचा महत्वाचा भाग असतात.

रस्त्यावरील विविध चालणार्‍या गोष्टी, व्यवहार हे “रस्त्यावरील नजर(Eyes on the street)” देतात व शेजार धर्माची भावना निर्माण करतात असे अमेरिकेतील जेष्ठ पत्रकार व शहर विकासातील कार्यकर्त्या जेन जाकोब्स म्हणतात.“रस्त्यावरील नजर(Eyes on the street)” म्हणजे काय तर रस्त्यावर विविध लोकांची गर्दी असेल तर काही वाईट किंवा त्रासदायक प्रकार एखाद्या व्यक्तिसोबत घडला तर ते आजूबाजूच्या लोकांच्या नजरेत येईल व त्या व्यक्तीला मदत मिळू शकेल. आजकालच्या गेटेड कॉलनी, पाळत ठेवलेले मॉल, खासगी मालकीच्या जागा असण्याच्या काळात सार्वजनिक जागा लोकशाही पूरक व राजकीयदृष्ट्या समाजात सहभागी होण्यासाठी, एकूण शहरात जीवंतपणा राखण्याचे काम करतात.

 

प्रिया फरांदे , परिसर

Add comment


Security code
Refresh