पुणेकर सुरक्षेसाठी मास्क वापरतात मग, हेल्मेट का नाही ?

कोरोनामुळे मानवी आयुष्य फार झपाट्याने बदलेले आहे. प्रत्येकाच्या जीवनात आमूलाग्र बदल दिसून येत आहेत. लोकांच्या आरोग्यविषयक सवयी बदललेल्या आहेत याविषयी दुमत नसावे.
सतत २० सेकंद साबणाने हात धुणे, हाताच्या बोटांचा डोळ्याला/तोंडाला स्पर्श होऊ न देणे, घसा कोरडा राहणार नाही याची काळजी घेणे. विशेष म्हणजे, व्यक्ती बाहेर जात असेल तर मास्कचा नियमित वापर करणे. अगदी ८० म्हाताऱ्या आजीबाई देखील मास्क वापरतात. या सवयीमध्ये झालेला बदल अथवा मास्क घालणे या निश्चितच चांगल्या सवयी आहेत.
मी जेंव्हा पुण्यातील लोक मास्क घातलेली पाहतो त्यावेळी मला प्रश्न पडतो ह्या लोकांनी मास्क वापरणे किती कमी कालावधीत स्वीकारले आहे. मग हेच हेल्मेटच्या बाबतीत दुचाकीचालकांकडून का होत नाही?
मास्क घालण्याबाबत कायदा आणि नियम आहेत. परंतु, मास्क घालण्याबाबत फार कारवाई न करता देखील, लोक सर्रासपणे मास्क वापरतात. व्यक्तिस्वातंत्र्याच्या गप्पा मारणारे आता कुठे आहेत, जीवाची यत्किंचितही पर्वा न बाळगणारे,  "आम्ही मेलो तर तुम्हाला काय फरक पडणार?"; असा वादविवाद घालणाऱ्यांची आता काय दातखिळी बसली का ? आता काही का म्हणत नाही ? "मी कोरोना मुक्त हवा ओढतो त्यामुळे मला मास्कची गरज नाही"; असे म्हणणारे पुणेकर कुठे आहेत?
Mask helmet M
"मास्क घालतो पण मला चिलखत द्या"; असे म्हणणारे आता का काही मागत नाही ? "मास्क घातल्यास गुन्हेगारी वाढेल"; असे तर्क लावणारे सजग पुणेकर स्थलांतरित झाले का काय ?. "आधी हवा शुद्ध करा, मग मास्क घालतो"; असे म्हणणाऱ्यांनी शनिवारवाड्यात आश्रय घेतला कि काय देव जाणे ? "लोकांनो, मास्क घालू नका, कोर्टात जाऊन आपली बाजू मांडा"; असा कायदेशीर सल्ला देणारे सामाजिक कार्यकर्ते आता भूमिगत झाले कि काय ? अंत्यविधी करणारी भट मंडळी आता मास्कची का होळी घालत नाही ? "मास्क घालणार नाही"; असे म्हणणारे आणि पोलिसांबरोबर वाद घालणारे दादा, भाऊ, कार्यकतें आता रस्त्यावर कुठे दिसत नाही. आता पुण्यातील खासदार, आमदार, नगरसेवक 'मास्क'; या मुद्द्यावरून निवडणूक लढविणार का?   
हेल्मेट सक्तीला समजातून, विविध वर्गातील लोकांकडून, कायमचा विरोध होताना दिसून येतो. एकट्या पुण्यात मागील १५ वर्षात किमान ८-१० वेळा हेल्मेट सक्तीची कारवाई झाली. प्रत्येक वेळी पुणेकरांनी अगदी शूरवीर योध्याप्रमाणे हि कारवाई हाणून पाडली आणि रिकामी डोके हेल्मेट न घालता रस्त्यावर फिरू लागले. भारत देशात सन २०१८ मध्ये, ४३, ६१४ आणि महाराष्ट्र राज्यात ५,२५२ दुचाकीस्वारांनी हेल्मेट न घातल्यामुळेआपला जीव गमाविला. जर त्यांनी हेल्मेट घातले असते तर यापैकी ४०% लोकांचा जीव नक्कीच वाचला असता आणि त्यांच्या कुटुंबीयांनी आपला प्रिय व्यक्ती गमावला नसता. 
सुरक्षा उपकरणे ही रोजच्या जीवनात उपयोगी केली जातात, जसे तांत्रिक काम करत असताना, साहित्य हाताळतांना हातमोजे वापरणे, प्रदूषणापासून डोळ्यांचे रक्षण करण्यासाठी गाँगल घालणे. तीव्र उन्हापासून मस्तकाचे संरक्षण व्हावे याकरता उन्हाळ्यात टोपी परिधान करणे, इ. लोकांच्या सवयी बदलल्या जाऊ शकतात. कोरोनामुळे आपण मास्क तर घालायला लागलो पण ज्या देशात १.५ लाख लोक रस्ते अपघातामुळे मरतात, त्या देशात लोक हेल्मेट कधी घालणार ?
- संदीप गायकवाड, रस्ता सुरक्षा एडव्होकसी को-ऑर्डिनेटर, परिसर